मुंबई – अवनी वाघिणीच्या मृत्यूप्रकरणी संजय
निरुपम यांच्याकडून राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर हे आरोप केले
जात आहेत आणि त्यांचा राजीनामा मागितला
जात आहे, हा सर्व प्रकार चुकीचा असल्याचे भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र
प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे. वन्यजीव प्रेमींकडून होत असलेले आरोप
अयोग्य असल्याचेही ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर
प्रदेशाध्यक्ष दावने यांनीही अवनी वाघिण मृत्यूप्रकरणी वनमंत्र्यांची पाठराखण केली
आहे.
प्रदेशाध्यक्ष दानवे म्हणाले, नरभक्षक
वाघिणीच्या मृत्यूचे राजकारण करणे योग्य नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाने
कार्यवाही करण्यात आली होती. मुळात वनमंत्री हे वाघिणीला मारण्याचे आदेश देऊच शकत
नाहीत, असेही ते म्हणाले. काँग्रेस नेते
संजय निरुपम यांनी केलेल्या आरोपांबद्दल दानवे म्हणाले, त्यांनी या प्रकरणात
केलेल्या आरोपांबद्दल त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्यात येईल.
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा
वनक्षेत्रात टी-१ अवनी वाघिणीची दहशत होती. दीड वर्षात तिने १३ जणांचा बळी घेतला
होता. येथील शेतकऱ्यांना शेती करणे अवघड झाले होते. यामुळे सुप्रीम कोर्टाने
जनभावना लक्षात घेऊन वाघिणीला पकडण्याचे किंवा मारण्याचे निर्देश दिले होते.
त्यानुसारच कारवाई झाल्याचे रावसाहेब दानवे म्हणाले. याप्रकरणी वनमंत्री
मुनगंटीवार यांनी चौकशी समिती नेमली आहे. याशिवाय सुप्रीम कोर्टाच्या ५
न्यायाधिशांची समिती स्थापन करुन चौकशी करण्याचीही तयारी सरकारची असल्याचे दानवे
यांनी सांगितले. ते म्हणाले यातून सत्य जनते समोर येईल.
















